मनपाचा बेजबाबदारपणा नागरिकांना लोटतोय मृत्यूच्या खाईत
शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मुख्य रस्ते, चौक, मांसविक्रीची दुकाने असलेल्या भागात तर नागरिकांना रात्रीचे सोडा, दिवसाही घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे.मात्र याकडे मनपाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. काल (दि.9) आकाशवाणी चौकात दुचाकी समोर अचानक कुत्रा आल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याआधी देखील शहरात मोकाट फिरणार्या कुत्र्यांमुळे अपघात घडले आहेत.कुत्र्यांच्या चाव्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या भरपूर घटना घडल्या आहेत.मनपाच्या या बेजबाबदारपणामुळे अजून किती बळी जाणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
आज घडीला शहरात 30 हजारांच्या सुमारास कुत्र्यांची संख्या असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.शहरातील उच्चभ्रू,सामान्य, स्लम अशा सर्वच भागात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. शहरातील कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे गेल्या काही वर्षांपासून नसबंदी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. मात्र कुत्र्यांची आजघडीला असलेली संख्या व होणार्या शस्त्रक्रिया यात मोठी तफावत असल्याने कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे.पालिकेकडे यासाठी कुठलीही सक्षम यंत्रणा नसल्याचेच यातून दिसून येते.कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी झारखंड येथील एजन्सीची मुदत संपल्याने आता राजस्थानच्या एजन्सीकडे हे काम सोपविण्यात आले आहे.पण हे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. आणि यात हकनाक सामान्य नागरिक बळी जात आहेत.
आजपर्यंत शेकडो बळी गेले
शहरातील मोकाट कुत्र्यांनी आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत.अनेकवेळा मुख्य रस्त्यांवर हे कुत्रे भटकत असतात. रात्री कमी रहदारी असल्याने अचानकपणे दुचाकी समोर कुत्रे आल्याने आजपर्यंत अनेक बळी गेले आहेत.काल झालेल्या घटनेप्रमाणेच 2018 मध्ये बीड बायपास रोडवर ऑर्गनवादक, कथाकार अशोक जाधव यांचा देखील कुत्र्यांचे टोळके गाडी समोर आल्याने दुदैवी मृत्यू झाला होता.कुत्र्यांच्या हल्ल्यात आजपर्यंत अनेक नागरिक अपंग, जखमी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र तरीही अजूनही यावर मनपा द्वारे कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
माणसांपेक्षा मनपाला कुत्र्यांची चिंता
मनपाच्या कुत्रे पकडणार्या गाड्या 24 तास फिरत असतात.दररोज आम्ही 25 ते 30 कुत्र्यांचे ऑपरेशन करतो. मात्र एकाचवेळी सर्व ठिकाणच्या कुत्र्यांना पकडून आणून सदर प्रक्रीया करु शकत नाही. अशाने कुत्र्यांची प्रजातीच नष्ट होईल. कम्युनिटी डॉग्सला पकडू शकत नाही.अशाने कुत्र्यांची प्रजातीच नष्ट होईल, असे डॉ. बी. एस. नाईकवाडे म्हणाले. यावरून मनपा माणसापेक्षा कुत्र्यांनाच जास्त महत्त्व देत असल्याचे दिसते.